मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास एक शिक्षक पाटोळे व चितनार वस्तीमार्गे शाळेत जात असताना त्यांना नाल्याजवळ बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी माघारी परतून वस्ती परिसरातील लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर शंभर ते दीडशेचा जमाव बिबट्याला पाहण्यासाठी नाल्याच्या दिशेने गेला. तोपर्यंत बिबट्या नाल्यात लपून बसला. लोकांनी गर्दी व गोंधळ घातल्यामुळे बिबट्या अधिक चवताळला. त्याने बाहेर येत सकाळी साडे अकराच्या सुमारास आधी दत्तू बाळू निमसे (४५, रा. निंबाळे) यांच्यावर हल्ला चढवला व पुन्हा लपून बसला. एका व्यक्तीला जखमी केल्यानंतरही गर्दी कमी होत नव्हती. लोकांचा गोंधळ सुरुच होता. तासाभराच्या अंतराने बिबट्याने पुन्हा प्रमोद उर्फ सोमा सोमवंशी (२०, रा. तळेगावरोही) यांच्यावर झडप घालून जखमी केले. दोघाही जखमींना उपचारासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ सोनवणे, सचिन सोनवणे, मोठ्याभाऊ सोनवणे, अर्जुन सोनवणे, बाळु पाटोळे, सरपंच नंदु चौधरी, कैलास पाटोळे, विलास नरोटे, तुकाराम गांगुर्डे, रामकृष्ण घुमरे हे परिस्थितीचा सामना करीत बिबट्यावर लक्ष ठेऊन आहेत. वनविभागाला कळविल्यानंतर अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधर पवार, विजय पगारे, नामदेव पवार आदी कर्मचारी निंबाळे परिसरात तळ ठोकून असून नाशिक येथून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बोलावला आहे. लोकांच्या गर्दी व गोंगाटामुळे बिबट्या निंबाळे शिवारातील नाल्यात दडून बसला आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी याच शिवारात मोरीखालून बिबट्याला ग्रामस्थांनी जेरबंद करुन वनविभागाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याने निंबाळे व तळेगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांदवड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 5:20 PM