नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोंदे फाटा येथील मिठाईचे दुकान अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडे चार वाजता घडली.आगीत शेजारी असलेल्या मोबाईल दुकानातील महागडे मोबाईल तसेच इतर वस्तू जळून भस्मसात झाल्या असून एका चारचाकी गाडीचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे. कोणतीही जीवीतहानी झाली नाही.गोंदे फाटा येथील मुकेश नगराम चौधरी यांच्या कजरी स्वीट या नावाच्या मिठाई दुकानाला पहाटे अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामध्ये दुकानातील रोजच्या वापरातील भांडी, वस्तू, तसेच मिठाईचे पदार्थ, तसेच साखर, तेलाचे डबे, फिर्नचर, सीसीटीव्ही कॅमेरे सेट, फ्रिज, लायटिंग, कुलिंग सिस्टिम, यासह अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीत दुकानात असलेल्या गॅसच्या चार सिलींडरपैकी दोन सिलिंडरचा स्फोट झाला असून दोन सिलिंडरला वाचविण्यात आले आहे. आगीत अंदाजे 35 लाख रूपयाचे नुकसान झाल्याचे पंचनामा करतांना दिलेल्या माहितीनुसार समजते. आगीने काही वेळाने उग्र रूप धारण करत आगीचे लोळ शेजारीच असलेल्या हरिभाऊ रामहारी गुळवे यांच्या साई मोबाईल यांच्या दुकानाचा पेट घेतला. यानंतर आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतू आग आटोक्यात येत नव्हती. यानंतर जिंदल कंनीतील अग्निशामक दलाला दुरध्वनीवरून माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिक येथील अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले असून या चार अिग्नशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले परंतू दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे दुकानातील किमती मोबाइल तसेच मोबाईलचे इतर पार्ट आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच मोबाईल दुकानातील महगडे मोबाईल व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये अंदाजे एकूण आठ लाख रूपयाचे नुकसान झाले. तसेच मोबाईल दुकानाच्या मागे असलेल्या एक छोटा हत्ती या गाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जवळपास अंदाजे 1 लाख सत्तर हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे समजते. तरी या अचानक लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास वाडिव-हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत..यावेळी गोंदे दुमालाचे तलाठी के.एस.अिहरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य परशराम नाठे, निलेश नाठे उपस्थित होते.
गोंदे फाट्याजवळ आगीत दोन दुकाने भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 1:04 PM