दिंडोरी : स्पर्धेच्या आणि संगणकाच्या युगात वावरत असताना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेल्या चिंतनाच्या आधारावर बुद्धीचा वापर करीत राजारामनगर येथील कादवा इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन चुलत भावंडांनी विजेवर चालणारी सायकल तयार करून अन्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सध्या शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी भरपूर वेळ मिळत असून, या वेळेचा सदुपयोग करून काही विद्यार्थी भविष्याचा वेध घेत आहेत. आंबे वरखेडा येथील कृष्णा राजेश वडजे (इयत्ता दहावी) व शिवम ज्ञानेश्वर वडजे (इयत्ता सहावी) या दोन्ही चुलत बंधूंनी केवळ तीन हजार रुपयांच्या टाकाऊ वस्तूंचा वापर करीत इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सायकलीचा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केला आहे.
चार्जिंगवर चालणाऱ्या सायकली उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्या किमती सर्वसामान्य लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. कृष्णा वडजे याने आठवीला असताना ब्लोअर तयार केले होते. चार्जिंगवर स्कूटर चालते यापासून प्रेरणा घेऊन आपणही इलेक्ट्रिकवर चार्जिंग करून चालणारी सायकल बनवू शकू, असा निश्चय मनाशी केला. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. सायकलला चार्जिंग बॅटरी बसविण्यासाठी एकूण तीन हजार रुपये खर्च आला. यासाठी लागणाऱ्या १२ व्होल्ट बॅटरी व २५० व्हॅट मोटर, एमसीबी स्विच, १.५ नंबर वायर, बाइकच्या इंजिनचे स्पॉकेट घेतले. तसेच इंजिनमधील टायमिंग चैन घेतली. मोटरीचे माप घेत सायकलला मोटर बसविण्यासाठी लोखंडाची पट्टी बसविली. त्या पट्टीला छिद्र पाडले व सायकलच्या पुढच्या चाकाला वेल्डिंग करून तेथे मोटर बसविली. स्पॉकेट चाकाला जोडले. टायमिंग चैन मापानुसार कमी करून मोटर बसविली. त्यानंतर बॅटरी ठेवण्यासाठी स्टँड तयार करून त्यास फिट केली. एमसीबी स्वीच ब्रेकजवळ व वायर बॅटरीला जोडली. अशा पद्धतीने सर्व जोडणी झाल्यानंतर बॅटरी चार्ज करून सायकल ३० मिनिटात ५ किलोमीटर अंतरापर्यंत सायकल बॅटरीवर चालली.
सदर प्रयोगाबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हाइस चेअरमन उत्तम भालेराव, सर्व संचालक व परिसरातून कौतुक केले जात आहे.
===Photopath===
021220\02nsk_10_02122020_13.jpg
===Caption===
विजेवर चालणाऱ्या सायकलीसह कृष्णा वडजे व शिवम वडजे.