चांदवड : चांदवड तालुक्यातील पाटे येथे बुधवारी ( दि. १७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास तळेकर कुटुंबीयातील दोन सख्ख्या भावंडांचा घरच्याच शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय तळेकर यांना ही दोनच मुले असल्याने तळेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांचा मोठा मुलगा ओम (वय १३) हा इयत्ता सातवीत तर प्रणव (वय ११) हा इयत्ता पाचवीत शिकतो. बुधवारी दोघे भाऊ शेताचे शेजारील नाल्यालगत शेळ्या चारण्यासाठी गेले असताना काही शेळ्या नाल्यालगत असलेल्या गट नंबर ६९ मधील शेततळ्यावर गेल्या. त्यांना हुसकावण्यासाठी प्रणव शेततळ्यावर गेला परंतु त्याचा तोल जाऊन तो शेततळ्यात पडल्या. आपला भाऊ तळ्यात पडल्याचे ओमच्या लक्षात आल्याने त्याने त्याला वाचविण्यासाठी तळ्यात उडी घेतली. परंतु दोघांचाही तळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन तासांनी शेळ्या घरी गेल्यानंतर घरातील मंडळीनी मुलांची चौकशी केली असता मुलांच्या चपला शेत तळ्यावर आढळून आल्या. परिसरातील पोहणाऱ्या नागरिकांनी गळ टाकून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती पोलीस पाटील मच्छिंद्र कासव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. चांदवड पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, चांदवड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात दाेघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.