नाशिक : शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून दुचाकी चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अंबड पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत होते. अंबड गुन्हे शोध पथक गुन्हेगारांच्या मागावर असताना पथकाला मोठे यश मिळाले आहे. दोघा तरूण चोरट्यांकडून सव्वा पाच लाख रूपये किंमतीच्या चोरीच्या तब्बल १२ दुचाकींसह घरफोडीत लंपास केलेल्या एक लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिण्यांची लगड, २ लाख २३ हजार ५०० रूपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स घरगुती वस्तू असा एकूण ९ लाख १३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघा संशयितांनी मागील चार महिन्यांत केलेल्या गुन्ह्यांपैकी आयुक्तालय हद्दीतील १४ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरात घरफोड्या, दुचाकीचोरी, सोनसाखळी चोरीसह लूटमारीच्या घटना वाढल्याने पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे गतीमान करत संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. अंबड गुन्हे शोध पथक चोरट्यांच्या मागावर असताना हवालदार भास्कर मल्ले, शिपाई दिपक वाणी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्याअधारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडलिंकरोड येथे सापळ रचला; मात्र सापळ्याची कुणकुण संशयितांना लागल्यामुळे ते तीन दिवस या भागात फिरकले नाही. बुधवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास दोघे संशयित येणार असल्याची खात्रीशीर माहिती पुन्हा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाटे सापळा लावला. दोघे संशयित त्या ठिकाणी आले; मात्र सापळ्यात अडकण्याऐवजी निसटून पळ काढण्यास सुरूवात केली. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अखेर जमालुद्दीन उर्फ जमालु मोहम्मद अय्युब चौधरी (२२, रा अंबड, मुळ उत्तरप्रदेश), मोहम्मद असराल मुश्ताक शहा उर्फ एम.डी (२१,रा. भारतनगर, वडाळारोड, मुळ उत्तरप्रदेश) यांच्या मुसक्या आवळल्या.-----अल्पवयीन गुन्हेगाराचे धुळे कनेक्शनपोलिसांनी दोघा संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या एका साथीदाराचे नाव उघड केले. त्या अल्पवयीन संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो धुळ्यामध्ये चोरीच्या दुचाकी विक्री करत असल्याचे तपासात पुढे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. धुळे येथे या संशयितांनी चोरीच्या दुचाकीविक्री केली असल्याची शक्यता असून पोलिसांनी चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
दोघा चोरट्यांकडून बारा दुचाकींसह सोने अन् दोन लाखांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 3:00 PM
या दोघा संशयितांनी मागील चार महिन्यांत केलेल्या गुन्ह्यांपैकी आयुक्तालय हद्दीतील १४ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देएक लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिण्यांची लगड९ लाख १३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत अंबड गुन्हे शोध पथकाला मोठे यश