नाशिक : शहर व परिसरातील रुग्णालय, महाविद्यालय तसेच व्यापारी संकुलांच्या परिसरातून दुचाकी चोरी होण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. दुचाकी चोरट्यांच्या मागावर गुन्हे शाखा असून गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाला दोघा दुचाकीचोरांना ताब्यात घेण्यास यश आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ९० हजारांच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.याबाबत गुन्हे शाखेने दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे हे गस्तीवर असताना बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांची खात्रीशिर माहिती मिळाली. दोघे चोरटे गोल्फ क्लब पार्किंगजवळ येणार असल्याचे बातमीदाराकडून सांगितले गेले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सदर माहिती पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना सांगितली. त्यानंतर पथकाने या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित समाधान उर्फ गोकुळ बळीराम गव्हाणे (२५), प्रशांत भगवान जाधव (२०, दोघे रा. पळसे), हे दोघे होंडा शाईन दुचाकीवरून आले. त्यांच्या दुचाकीला कुठल्याहीप्रकारे क्रमांक नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पथकाने त्यांना शिताफीने अटक केली. त्यांची कसूच चौकशी केली असता त्यांनी जिल्हा रूग्णालयाच्या वाहनतळातून त्यांच्या ताब्यातील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून तत्काळ पोलीस कोठडी मागितली. पोलीस कोठडीदरम्यान दोघा संशयित चोरट्यांनी शहरातील जिल्हा रूग्णालय वाहनतळ, धामणगाव येथील एस.एम.बी.टी वैद्यकिय महाविद्यालय आवार, बिटको रूग्णालय, देवळाली कॅम्प परिसरातील लॉन्स यासह बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ४ देवळाली पोलीस ठाणे, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून तसेच वाडीवºहे हद्दीतून प्रत्येकी १ असे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ९० हजार रूपये किंमतीच्या दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
दोघे चोरटे ताब्यात : चोरीच्या दहा दुचाकी गुन्हे शाखेने केल्या हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 4:07 PM
गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे हे गस्तीवर असताना बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांची खात्रीशिर माहिती मिळाली. दोघे चोरटे गोल्फ क्लब पार्किंगजवळ येणार असल्याचे बातमीदाराकडून सांगितले गेले.
ठळक मुद्दे३ लाख ९० हजारांच्या दहा दुचाकी हस्तगत