सिन्नर : तालुक्यातील वावी येथे शेतातील बोअरवेलजवळ विद्युत मोटारीच्या वायरला जोडून जमिनीत गाडून ठेवलेल्या सुुरुंगाच्या स्फोटात मजुराला जीवे मारण्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास वावी पोलिसांनी २४ तासात लावला आहे. याप्रकरणी संशयितासह सुरुंग देणाऱ्या इसमाला वावी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तालुक्यातील वावी येथे शेतातील कूपनलिकेजवळ विद्युत मोटारीच्या स्टार्टरजवळ अज्ञात संशयिताने मातीत गाडून ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला होता. खंडू रेवजी वाघचौरे (३१, रा. शहा, हल्ली रा. वावी) हा गंभीर जखमी झाला होता. वावी शिवारात सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला हॉटेल पाहुणचारच्या पुढे विवेक लक्ष्मण सांगळे यांच्या शेतात हा गंभीर प्रकार घडला होता. याप्रकरणी वावी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुंग स्फोट का व कोणी केला याचा तपास करण्याचे आव्हान वावी पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. कोते यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक व्ही.एन. सोनवणे, नितीन जगताप, सोपान शिंदे, प्रकाश उंबरकर, पंकज मोंढे, प्रकाश चव्हाण, भास्कर जाधव यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते. तपास पथकाने २४ तासात चक्रे फिरवून व व गुप्त बातमीदारामार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित इसम बाळू दौलत कासार (रा. मिठसागरे) याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खंडू वाघचौरे याने गेल्या आठवड्यात आमच्या घरी येत नको जाऊ, नाहीतर तुझा बेत पाहील, असा दम दिला होता. त्यामुळे आपणच डिटोनेटरच्या वायरी या लाइटच्या स्टाटर्सच्या वायरीला जोडून स्फोट घडवून आणला अशी कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी बाळू कासार यास अटक केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित बाळू कासार यास डिटोनेटर्स देणाऱ्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील काळुराम मोहनलाल लोनिया यास अटक केली. सदर गुन्ह्यात भादंवि क ३४ सह स्फोटक अधिनियम कायदा कलम ५ चे ९ (ब) हे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सागर कोते अधिक तपास करीत आहेत.