पंचवटी : रामवाडीच्या आदर्शनगरमधील किशोर रमेश नागरे या युवकाच्या खुनातील दोघा फरार संशयितांना पंचवटी पोलिसांनी सिडको परिसरातून ताब्यात घेतले असून, यापैकी एक विधीसंघर्षित असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, पूर्ववैमनस्य व भाईगिरीतून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ गत मंगळवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून किशोर नागरे याचा खून केल्याची घटना घडली होती़ आदर्शनगरमधील रहिवासी किशोर नागरे हा जाधव खुनातील महत्त्वाचा साक्षीदार असल्याने त्याच्या खुनाबाबत विविध तर्कवितर्क केले जात होते़ या खुनाचा तपास करीत असतानाच पोलिसांना संशयित शुभम निवृत्ती पांढरे याची माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली़ त्यामध्ये मयत नागरे व घारपुरे घाटावरील विधीसंघर्षित तसेच गणेशवाडीतील मित्र अविनाश उर्फ वामन्या वाणी यांच्यात काही दिवसांपासून वाद निर्माण झाले होते. या वादातूनच गत मंगळवारी नागरे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांकडे दिली आहे़ सप्टेंबर २०१५ मध्ये ठक्कर बझार बसस्थानकाजवळील हॉटेल तुळजासमोर रामवाडीतील गुणाजी जाधव याचा खून झाल्याची घटना घडली होती़
नागरे खुनातील दोन संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:29 AM