नाशिक : शहर व जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी करणाºया दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारी (दि.३१) दिली.गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील पोलीस नाईक शांताराम महाले यांना मोटारसायकलची चोरी करणारे संशयित पेठ तालुक्यातील हरसूलरोड परिसरातील आडगावात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार प्रवीण कोकाटे, पोलीस नाईक फै याज सय्यद, दिलीप मोंढे, शिपाई विशाल देवरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून पेठ तालुक्यातील स्मारकनगर येथील विजय परसराम गांगुर्डे व ऊसतळे, वडपाडा येथील अनिल जनार्दन भुसारे (२२) हे दोघेही त्यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या पल्सरवर आढळून आले. यावेळी त्यांच्याकडे मोटारसायकलविषयी चौकशी केली असता त्यांनी घोटीतून ती चोरी केली असल्याचे सांगितले.चोरी केलेल्या दुचाकीचा मूळ क्रमांक एमएच ३३, आर २२५७ असा असताना त्यांनी नंबर बदलून एमएच १५, डीक्यू ३२९६ असा बनावट क्रमांक टाकला होता. याविषयी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केल्याने त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, त्यांनी घोटी, सुरगाणा तसेच सातपूर येथील एबीबी कंपनीच्या पार्किंगमधून प्रत्येकी एक व मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे.२०१९ या वर्षात गुन्हे शाखा युनिट एकने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ५५ गुन्ह्यांतील २४ लाख १४ हजार रुपये किमतीच्या ५५ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
मोटारसायकल चोरणाऱ्या दोघा संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 1:03 AM