इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गुरुचरणसिंग बलकार सिंग (२६,रा़ गुरुद्वारा वाडा साहिब लोदिपूर तहसील आनंदपूर पंजाब) व महेंद्र सुदाम धवडगे (२८, रा़ रंगरेज मळा कलानगर इंदिरानगर) या दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी शुक्रवारी (दि़१) पत्रकार परिषदेत दिली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालीत होते़ पथकातील विनोद खांडबहाले यांना सराफनगरमधील साई इंटरप्रायजेस वॉटर सर्व्हिसेसच्या रोडलगत पॅशन दुचाकीवर दोन संशयित कापडी पिशवीत बेकायदेशीररीत्या तलवारी घेऊन आल्याची माहिती मिळाली़ त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांना दिली़ गुन्हे शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे, विनोद खांडबहाले, रमेश टोपले, राजू राऊत, राजेश निकम, भगवान शिंदे, शरद अहेर यांनी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी पोहोचले़ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पॅशन दुचाकीवर जात असलेल्या दोन संशयितांना पाठलाग करून पकडले़ पॅशन दुचाकीवरील संशयित गुरुचरण सिंग व महेंद्र धवडगे या दोघांकडील कापडी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीसाठी आणलेल्या सोळा तलवारी आढळून आल्या़ या दोघांकडील तलवारी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्यावर बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगल्या प्रकरणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, धबडगे महाविद्यालयीन कर्मचारी बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित महेंद्र धबडगे हा गुरूगोविंद सिंग महाविद्यालयातील कर्मचारी आहे़ संशयित चरणसिंग हा महाविद्यालयात कडे विकण्यासाठी आला असता त्याच्याशी धबडगेची ओळख झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:05 AM