नाशिक: कोणत्याही एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के प्रवासाची सवलत असल्याने रक्षा बंधनाच्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करीत बहिणींनी भावाचे घर गाठले. यामध्ये सर्वाधिक सुमारे दोन हजार भगिनी पुण्याला तर दिड हजार धुळ्याला पोहचल्याचा अंदाज आहे. रक्षाबंधनाच्या एकाच दिवशी सुमारे पाच हजार महिलांनी एस.टी. बसमधून प्रवास केल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला.
महिलांना एस.टी. बसमधून अर्ध्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत असल्याने या सवलीचा सर्वाधिक लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्यात आला. नाशिकमधील ठक्कर स्थानकात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाली होती. या स्थानकातून धावणाऱ्या पुणे आणि धुळे बसेसला सर्वाधिक महिलांची गर्दी होती. पुण्याला जाण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स शिवाई, महामंडळाची शिवशाही याबसेसेला देखील अर्धे तिकीट असल्याने दिवसभर या बसेस प्रवाशांच्या गर्दीने भरभरून जात होत्या. हिच अवस्था धुळे ची देखील होती. धुळ्याकडे जाणाऱ्या भगिनींनी बसमधून प्रवासाला पसंती दिल्याने स्थानकात धुळ्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.