नाशिक : सिंहस्थ अंतर्गत कोणत्याही कामांच्या गुणवत्तेविषयी तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी घेतल्यानंतर महापालिकेमार्फत शहरात सुरू असलेल्या २५ रस्त्यांच्या कामांची त्रयस्थ संस्थांमार्फत २०५० वेळा गुणवत्ता चाचणी घेण्यात आली आहे. या गुणवत्ता चाचण्यांवर महापालिकेला ६६ लाख ८२ हजार रुपये मोजावे लागले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अंतर्गत आणि बाह्य रिंगरोडची सुमारे ४६२ कोटींची २५ कामे सुरू असून, त्यातील बव्हंशी कामे अंतिम टप्प्यात आहेत. रस्त्यांच्या कामांचा दर्जा व गुणवत्तेविषयी तक्रारी येऊ लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी गुणवत्तेबाबत तडजोड करणार नसल्याचे निक्षूण सांगितले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्रयस्थ संस्थांमार्फत गुणवत्ता चाचणी करून घेण्याचे निश्चित केले होते. सिंहस्थांतर्गत रस्त्यांची कामे करताना महापालिकेने संबंधित मक्तेदार ज्या खाणीतून हार्ड मुरूम, खडी उचलणार होता तेथील मटेरियलची त्रयस्थ संस्था क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून तपासणी करून घेण्यात आली. महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या मानांकन व ग्रेडेशननुसारच रस्त्यांची कामे करताना प्रत्यक्षात साईटवर मटेरियल वापरण्यास परवानगी देण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. (प्रतिनिधी)
दोन हजार वेळा गुणवत्ता चाचणी
By admin | Published: June 17, 2015 11:55 PM