गोकूळ सोनवणे : सातपूरगेल्या २५ वर्षांत महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या राजवटीत सातपूर विभागाकडे दोन वेळा सर्वोच्च असे महापौरपद आणि एक वेळा स्थायीसमिती सभापतिपद मिळाले. महत्त्वाची पदे मिळवूनही सातपूर विभागातील विकासाचे प्रकल्प रेंगाळलेलेच आहेत.गेल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत महापालिकेत अनेक पक्षांची सत्ता आली. दुसऱ्या पंचवार्षिक काळात सातपूर विभागाला प्रकाश मते यांच्या रुपाने महापौरपद मिळाले. त्यावेळी महापौरपद एक वर्षासाठी होते. मते यांनी सातपूर विभागासाठी काही ठोस विकासाची कामे केली नसली तरी त्यांनी संपूर्ण शहरासाठी घंटागाडी संकल्पना मात्र राबविली. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक काळात दशरथ पाटील यांनी महापौरपद खेचून आणले. ऐन सिंहस्थ कुंभमेळा काळात पाटील यांची महापौरपदी वर्णी लागल्याने केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे श्रेय साहजिकच पाटील यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्याकाळात सातपूर विभागासाठी तरण तलाव, चौक सुशोभीकरण, जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर गावात रु ग्णालय, शाळेची इमारत, गंगापूर ते जलालपूर नदीवर पूल, पिंपळगाव बहुला त्र्यंबक रस्त्यावर पूल, सातपूर कॉलनीत प्रथमोपचार केंद्र, भव्य कमान आदी विविध विकासाची कामे झाली. तर सद्यस्थितीत सलीम शेख हे स्थायी समिती सभापतिपद भूषिवत आहेत. शेख यांच्या सभापतीपदाच्या काळात नवीन घंटागाड्या, खतप्रकल्पाचे खासगीकरण, उद्यानांची देखभाल यासह मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. दोन वेळा महापौरपद लाभूनही सातपूर विभाग मात्र अजूनही अन्य विभागांच्या तुलनेत विकासापासून दूर आहे.
दोनदा महापौरपद लाभूनही विकास दूर
By admin | Published: January 18, 2017 12:27 AM