नाशिकरोड : येथील वि. दा. सावरकर उड्डाण पुलावर लोखंडी पाइप घेऊन जाणाऱ्या उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून भरधाव वेगात आलेली आयशर ट्रक आदळल्याने चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, सकाळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. सिन्नरहून नाशिकच्या दिशेने लोखंडी पाइप घेऊन जाणारा ट्रेलर (एनएल ०५ डी ५१४४) याचे शुक्रवारी पहाटे डिझेल संपल्याने सावरकर उड्डाण पुलावर बिटको चौकाच्या वर पुलाच्या एका बाजूला कंटेनर उभा होता. दरम्यान, पाठीमागून सीमेंटचे पत्रे घेऊन जाणारी आयशर ट्रक (एमएच २० डीई ०५७६) च्या चालकाला अंधारात उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने आयशर ट्रक त्या कंटेनरवर व त्यावरील लोखंडी पाइपांवर जाऊन आदळला. यामध्ये ट्रकचालक शेख महंमद शेख हसन व क्लिनर शेख महंमद दोघे रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ट्रेलरवर ट्रक आदळून दोघे जखमी
By admin | Published: May 22, 2015 11:11 PM