नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन संशयितांना नाशिकरोड परिसरातून अटक केली आहे़ अलोक ऊर्फ राजन मुनचुंग सिंग (२०, रा. खांडवेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) व राहुल बाविस्कर (२७, रा. उर्दू शाळेजवळील चाळ, साईनाथनगर, जेलरोड) अशी अटक केलेल्या संशयितांनी नावे असून, त्यांच्याकडून ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ युनिट एकचे पोलीस हवालदार रवींद्र बागुल यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित नाशिकरोड परिसरातील त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह एक पथक तयार करून साईनाथनगर परिसरातील घरी छापा टाकला असता संशयित राहुल बाविस्कर पोलिसांच्या हाती लागला़ पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता काही महिन्यांपूर्वी आपल्या साथीदारासह म्हसरूळ परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली़ पोलिसांनी त्याचा साथीदार संशयित अलोक सिंग यास अटक करून चौकशी केली असता घरफोडीत चोरलेले दागिने त्यांनी एका सराफाला खोटी माहिती देऊन विक्री केल्याचे सांगितले़ पोलिसांनी या सराफाकडून ५१ हजार रुपये किमतीची १७ ग्रॅम सोन्याची लगड, १६ हजार रुपये किमतीची ४०० ग्रॅम वजनाची चांदी असा ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केलाआहे़ दरम्यान, या दोघा संशयितांकडून शहरातील आणखी काही घरफोड्यांच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे़ सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागुल, मोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली़
म्हसरूळ परिसरातील दोन अट्टल घरफोड्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:44 AM