नाशिक : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने दोन जणांचे बळी घेतले आहेत. या पावसाने द्राक्षबाग आणि अन्य पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शहर व जिल्ह्यात मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील पावसाने विजेच्या गडगडाट व वादळासह हजेरी लावली. मालेगाव शहरातील गुलशन-ए-इब्राहीम येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने बालकाचा मृत्यू झाला. शेख इमरान शेख फिरोज (१४) रा. पाचवी गल्ली, गुलशेरनगर असे मृत बालकाचे नाव आहे. गेल्या २४ तासात वीज व वादळामुळे दोन बालकांनी जीव गमावला. अन्य घटना कळवण तालुक्यातील मानूर येथे घडली. अंगावर वीज कोसळल्याने शीतल अशोक हळदे (१८) या तरुणीचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि गारांचा मारा यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाही बेमोसमी पावसाचा फटका सहन करावा लागत असल्याने बळीराजात चिंतेचे वातावरण आहे. दिंडोरी, वणी, पिंपळगाव, भालूर, मनमाड, भालूर, एकवई, धनेर, नवसारी, चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई गावांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस झाला. पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा निर्यात होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला आहे.
अवकाळी पावसाने घेतले दोन बळी
By admin | Published: March 01, 2016 11:53 PM