येवला : तालुक्यातील सत्यगाव येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून मांडूळ जातीच्या सापासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे.सत्यगाव येथे राहणारा सोमनाथ रामनाथ पवार (२३) याने व एक अज्ञान बालक यांनी मांडूळ साप पकडून राहते घरात लपवून ठेवल्याची बातमी वनविभागाला मिळाली होती. सदर माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम. बी. पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, पंकज नागपुरे, एन. एम. बिन्नर, वनसेवक विलास देशमुख आदींनी सत्यगाव येथे सोमनाथ पवार याच्या घरी छापा मारला. घरासमोर एका रांजणात माती भरून त्यामध्ये मांडूळ जातीचा साप लपवून ठेवलेला आढळून आला. सदर साप व सोमनाथ पवारसह अज्ञान बालक या दोघा संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी, (दि. २ जून) सोमनाथ पवारसह बालकास येवला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना ६ जूनपर्यंत वनविभागाची कोठडी दिली आहे. अधिक तपास उपवनसंरक्षक पूर्व भाग नाशिक तुषार चव्हण, सहायक वनसंरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मांडूळ सापासह दोघेजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:42 PM