मालेगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या आठवड्यात एकूण ५० चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून, मालेगावातील तिघा दुचाकी चोरांना अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात सिन्नर तसेच सुरगाणा तालुक्यातील पाच दुचाकी चोरांना ताब्यात घेऊन ३० दुचाकी जप्त केल्या होत्या. दरम्यान, काल २२ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव, सटाणा, कळवण तालुक्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना मालेगाव येथील दुचाकी चोर देवळा येथे दुचाकी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची खबर मिळाली. याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महात्मा फुले पुतळा परिसरात सापळा लावून मुशरीफ खान आरीफ खान (२३) रा. म्हाळदे शिवार मैला डेपो, जहीर अहमद अब्दुल माजीद (३३) रा. कारवा चौक, आझादनगर यांना अटक केली. त्यांच्या ताब्यात बजाज डिस्कव्हर दुचाकी मिळून आली. सदर दुचाकीच्या चेसीस व इंजिन नंबरवरुन मुळ मालकाबाबत माहिती घेतली असता सदरची दुचाकी ही देवळा पोलीस ठाण्यातील असल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता आरोपींनी त्यांचा साथीदार तौसीफ उर्फ नाट्या (पूर्ण नाव माहित नाही) रा. आझादनगर याच्यासह मालेगाव, देवळा, साक्री, धुळे, नाशिक, दिंडोरी अशा विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसºया पथकाने मिळवलेल्या माहितीवरुन सुरगाणा तालुक्यातील गुही गावात चोरीच्या दुचाकी कमी किंमतीच्या दरात विक्री केल्या जातात याबाबत समजल्यावरुन गुही येथील एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेऊन त्याच्या घराच्या बाजुच्या बोळीमध्ये लावलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने व त्याचा साथीदार गणेश शिवराम पवार उर्फ गण्या बाटा रा. अलंगुन याच्यासह जिल्ह्यातील तसेच गुजरात राज्यातुन चोरी केल्याची कबुली दिली. बालकाच्या ताब्यातुन ४ हिरो सप्लेंडर, ३ बजाज प्लसर, १ हिरो सुपर स्पलेंडर, १ होण्डा युनीकॉर्न अशा ९ दुचाकी किंमत ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातर्फे तौसीफ नाट्याचा शोध घेण्यात येत असून, त्याच्या ताब्यातून तीन बजाज डिस्कव्हर, दोन बजाज प्लॅटिना, पाच हीरो स्प्लेंडर, एक यामाहा एफझेड अशा ११ दुचाकी किंमत ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दुचाकी नंबर प्लेट बनावट असून, मूळ मालकांचा शोध सुरू आहे. सदर दुचाकी चोर सराईत गुन्हेगार असून, दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:24 AM