घोटी : इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करून दुचाकी विक्र ी करणाऱ्या टोळीला घोटी पोलिसांना पकडण्यात यश आले असून या सात जणांच्या टोळीकडून सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घोटी शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. या चोरट्याना पकडण्याचे गंभीर आव्हान घोटी पोलिसांसमोर उभे राहिले होते. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे यांनी विशेष पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना दिल्या होत्या. यानुसार या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, घोटी शहरात काही संशयित युवक चोरीच्या दुचाकी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.यानुसार भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, पोलीस नाईक विश्वास पाटील, शीतल गायकवाड, गणेश सोनवणे, कृष्णा कोकाटे, कासार, सानप, मथुरे चालक नितीन भालेराव आदिच्या पथकाने घोटी शहरात सापळा रचला असता अमोल क्षीरसागर रा.घोटी, नामदेव वारघडे रा.गोवंडी, रत्नेश राय रा.गोवंडी, सचिन म्हसणे रा.फांगुळ गाव , सुभाष सगभोर, रा.वाकी (अकोले) कैलास शेळके रा.अकोले,योगेश उघडे रा.अकोले या सात संशियतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या ताब्यातील सात दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
दुचाकी चोरणारी टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:39 PM