मनमाड : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला बेमुदत चक्का जाम आंदोलन १४ व्या दिवशीही सुरू होता. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच मनमाड बस स्थानकात जेथे बसेस उभ्या राहतात, त्या फलाटांवर रविवारी चक्क सर्वत्र मोटरसायकली उभ्या करून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली आणि हा विषय चर्चेचा बनला.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनात नावीन्य आणण्यासाठी विविध प्रकारची शक्कल लढवीत आहेत. मात्र आज तर कहरच झाला. जेथे प्रवाशांना दररोज लाल परीची चाके असलेल्या बसेस दिसतात, तिथे सर्व फलाटांवर चक्क दुचाकी लावल्याचे दिसत होते. या अभिनव प्रकाराने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचे आंदोलन तसेच बस स्थानकाचे आवार चर्चेत आले.
एरवी एखाद्या प्रवाशाला प्रवासासाठी आपले दुचाकी वाहन बसस्थानकात लावून बाहेरगावी जायचे असल्यास, दहा रुपये रोख देऊन दुचाकी पार्किंगला लावावी लागत होती. बसस्थानकामध्ये दुचाकी नेण्यास मज्जाव केला जातो. मात्र आज परिस्थिती उलट दिसत होती. दुचाकीसाठी केलेली पार्किंगची जागा रिकामी व बसस्थानकाचे सर्व फलाट दुचाकी वाहनांनी भरलेले, असे आगळेवेगळे दृश्य पाहून आजुबाजूने जाणारे व येणारे नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र या दुचाकी बस स्थानकाच्या फलाटावर उभ्या केल्याबद्दल कोणावरही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समजते.