याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कलानगर, साई पॅलेस सोसायटीच्या वाहनतळावर मोहिते यांनी त्यांच्या मुलाच्या मित्राची पल्सर दुचाकी क्रमांक (एमएच१५ ईवाय ०१४३) उभी केलेली असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटविली. त्याचवेळी इमारतीत राहणाऱ्या संजयतीलाल सांबरे यांची ॲक्टिव्हा क्रमांक (एमएच १५ ईवाय ६३०९) उभी होती. पल्सर जळाल्याने ॲक्टिव्हानेदेखील पेट घेतला तर, शेजारी राजेंद्र गणपत खाडे यांची चारचाकी इको स्पोर्ट्स क्रमांक (एमएच १५ ईएफ ४२१२) उभी असल्याने पेटली. या घटनेत मोहिते यांच्या मुलाचा मित्र सुनील गांगुर्डे याची पल्सर, सांबरे यांची ॲक्टिव्हा जळून खाक झाली तर, खाडे यांची चारचाकीसुद्धा निम्म्यापेक्षा अधिक जळाली.
मध्यरात्री वाहन जळाल्याची घटना घडल्यानंतर समोरच्या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना सांगितले. त्यानंतर नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविली. त्यानंतर सदर घटनेची म्हसरुळ पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.