----
जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण
मालेगाव : शहरातील द्याने येथील स्मशान भूमीजवळील पुलावर जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर कटरने वार करून दुखापत केल्याप्रकरणी किरण प्रकाश बागुल याच्या विरूद्ध रमजान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबीन अन्सारी मोहंमद शादाब (रा. सलमान फारशी मशिदीजवळ) याने फिर्याद दिली. १५ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी हा इतरांसोबत जात असताना त्यास शिवीगाळ केली व कटरने दुखापत केली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
----
देवीचा मळा भागात हाणामारी
मालेगाव : शहरातील देवीचा मळा भागात पान दुकानासमोर उधार पान मसाला मागितल्याचा राग आल्याने फिर्यादीस मारहाण केल्याप्रकरणी अमीनअली अब्दुल्ला, बिलाल (पूर्ण नाव माहीत नाही), अमिन अब्दुल्लाचे दोन साथीदार यांच्या विरूद्ध पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. माजीद शेख इस्त्राईल रा. नूरबाग, म्हाडा प्लॉट याने फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार धारणकर करीत आहेत.
----
मिळकत हडप करण्याचा प्रयत्न
मालेगाव : सर्व्हे नं. ५६/२, प्लॉट नं. १३, क्षेत्र ४८४ चौरस मीटर ही मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने तोतया महिला उभी करून बनावट व खोटी कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी सुनील साहेबराव निकुंभ (४५, रा. मोहाडी, उपनगर, मारूती मंदिराजवळ, धुळे) व इतर यांच्याविरोधात छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमिला वसंत बोरसे (७३, रा. जय अंबिका हौसिंग सोसायटी, बारा बंगला) यांनी फिर्याद दिली. येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात ही घटना घडली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
----
रावळगाव शिवारात गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव शिवारात आदिवासी वस्तीजवळ विनापरवाना विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखू पीकअप वाहनात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी दत्ता जिभाऊ वडक्ते (२१) किराणा दुकान, रावळगाव व पांडकर (पूर्ण नाव माहीत नाही) यांचे विरूद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दत्ता वडक्ते यास अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश रजेसिंग दाभाडे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी ९ लाख ५४ हजार ८०० रुपये किमतीचा विमल पान मसाला, तंबाखूची पाकिटे, पीकअप वाहन क्रमांक एमएच १९ सीवाय ०१९२ किंमत ५ लाख ५० हजार असा एकूण १५ लाख ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे करीत आहेत.