मानोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना दोन संशयित वेगवेगळ्या मोटारसायकलवर येवल्याच्या दिशेने जात असताना विशेष पोलीस पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घालून उसाच्या शेतात घुसून चोरट्यांना जेरबंद केले.
दोन्ही मोटारसायकलच्या मागील व पुढील नंबरप्लेट या वाकवलेल्या दिसून आल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी मोटारसायकलचा वेग वाढवला. त्यामुळे पोलिसांनीही मोटारसायकल स्वारांचा पाठलाग सुरू केला. हा थरार सुरू असताना भरधाव वेगातील कारमधून पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब टिळे, प्रवीण काकड आदींनी बाहेर वाकून या मोटारसायकल चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या चोरट्यांनी त्यांच्या हाताला झटका देवऊन मोटारसायकलचा वेग वाढवून आडवळणी रस्त्याने येवला तालुक्यातील मानोरी बु. नेउरगाव शिवारात चोरीच्या मोटारसायकल यातील बजाज पल्सर (एमएच १५ -एफएक्स ७१९७) तर दुसरी मोटारसायकल टीव्हीएस आप्पाची (एमएच १५- जीबी ६३९९) या शेताजवळ टाकून दिल्या व काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात लपून बसले होते.
दरम्यान पावलाच्या ठशावरून विशेष पोलीस पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घालून उसाच्या शेतात घुसून चोरट्यांना जेरबंद केले.नाशिक ग्रामीण विशेष पोलीस पथकाच्या सजगतेमुळे पंचवटी परिसरातील घरफोडीमध्ये चोरी केलेल्या मोटारसायकलसह चोरटे ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मानोरी बुद्रूक येथील शेतकरी आपल्या शेतात कांद्याला पाणी भरत असताना हे दोन संशयित थेट मोटारसायकल घेऊन शेळके यांच्या शेतात घुसले. शेतातून पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या चोरट्याने मोटारसायकल काटेरी झुडपात टाकून पळ काढला आणि येथून जवळच असलेल्या नेउरगाव शिवारातील उसाच्या शेतात लपले होते.
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक पेल्यानंतर पोलीस पथक.