नाशिक : पांडवनगरी परिसरात मंगळवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी पेटवून पुन्हा दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान एका कारच्या काचाही फोडल्याचे उघडकीस आले आहे. यापुर्वीही अशा पध्दतीने मोटारींच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.पांडवनगरी परिसरातील आकाश आरभ सोसायटीमध्ये राहणारे अजय उपासणी (४०) हे सोमवारी रात्री नियमितपणे सव्वादहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतले. राहत्या इमारतीच्या वाहनतळात त्यांनी दुचाकी स्पेलेंडर (एम.एच १५ बीझेड ७५४०) ही दुचाकी उभी केली. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उपासनी यांना खिडकीबाहेर धूर व आगीच्या ज्वाला दिसू लागल्याने ते तत्क ाळ घरातून धावत खाली उतरले असता त्यांची दुचाकी आणि दुसरी दुचाकी (एमएच१५ बीजे ५१५७) जळत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ आरडाओरड करून नागरिकांना जागे केले. रहिवाशांनी घरातून पाणी आणत तत्काळ पेटलेल्या दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. आगीच्या भक्ष्यस्थानी दोन्ही दुचाकी पडल्याने त्यांचा कोळसा झाला. या जाळपोळीचय घटनेत सुमारे २७ ते ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपआयुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली. तसेच गुन्हे शोध पथकाला तातडीने संशयितांचा शोध घेत अटक करण्याचे आदेश दिले आहेत.--सणासुदीच्या तोंडावर गुन्हेगारीगणेशोत्सव, मोहरम, नवरात्रोत्सवसारखे सण तोंडावर आले असून परिसरात पुन्हा गुन्हेगार सक्रीय झाले आहेत. वृध्द महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडणे असो किंवा सोसायट्यांच्या वाहनतळात उभी असलेली वाहने असो चोरट्यांकडून ती लक्ष्य केली जात आहे. याबरोबरच दुचाकी, चारचाकी वाहने पेटवून देण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल वाढली आहे. यामुळे इंदिरानगर पोलिसांपुढे ऐन सणासुदीच्या काळात डोके वर काढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
पांडवनगरीच्या सोसायटीत उभ्या असलेल्या दुचाकींना लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 6:24 PM
यापुर्वीही अशा पध्दतीने मोटारींच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
ठळक मुद्देआगीच्या भक्ष्यस्थानी दोन्ही दुचाकी पडल्याने त्यांचा कोळसा२७ ते ३० हजार रूपयांचे नुकसान झाले