नाशिकरोड : देवी चौक सराफ बाजार येथे एका महिला ग्राहकाच्या पर्समधून चांदीचा मुकुट चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना नागरिकांनी शोध घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून चोरी केलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी जप्त केला आहे.
देवीचौक सराफ बाजार येथील शेगावकर ज्वेलर्सचे योगेश श्रीकृष्ण शेगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानांमध्ये अलका दिनकर खर्जुल यांनी २६ ग्रॅम वजनाचा २ हजार १५५ रुपये किमतीचा चांदीचा मुकुट खरेदी केला होता. शेगावकर यांच्या दुकानातून खर्जुल बाहेर पडल्यानंतर पुन्हा काही वेळाने खर्जुल यांनी पुन्हा दुकानात येऊन चांदीचा मुकुटबाबत विचारणा केली. त्यानंतर शेगावकर यांनी दुकानाबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता खर्जुल पणती खरेदी करत असताना पाठीमागून आलेल्या दोन महिलांनी त्यांच्या पर्समध्ये हात टाकून चांदीचा मुकुटाचा बॉक्स काढत असल्याचे दिसून आले. त्यानंतर शेगावकर, अलका खर्जुल यांच्यासह परिसरातील काही व्यावसायिकांनी सराफ बाजारात त्या महिला चोरांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या. त्यांना मुकुट चोरल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी देत पळ काढण्यास सुरुवात केली. याघटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन चांदीचा मुकुट चोरणाऱ्या संशयित आरोपी सविता गणेश पवार, सुरेखा ज्ञानेश्वर पवार (रा. शिवाजीनगर झोपडपट्टी औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील पिशवी व पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये खर्जुल यांनी खरेदी केलेला चांदीचा मुकुट मिळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.