नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजपत्रित महिला अधिकाऱ्यांनी शासनदरबारी महिलांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन सादर करून विविध मागण्या केल्या. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसमोर प्रशासनातील जबाबदारी पार पाडताना मुलांच्या संगोपनाचीही सर्वात मोठी जबाबदारी असते. आजारपणात मुलाला घरी सोडून अथवा परीक्षा कालावधीत कार्यालयात येताना तिच्यावर मोठे दडपण असते त्यामुळे केंद्राप्रमाणे दोन वर्षाची हक्काची बालसंगोपन रजा मिळणे आवश्यक असून, या संदर्भात २०१५ मध्येच राज्य सरकारला निवेदन देण्यात आले आहे त्याचा विचार व्हावा. या शिवाय महिलांना कामाच्या ठिकाणी काम करताना पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधून देण्यात यावी आदी मागण्या करण्यात निवेदनात करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी सरिता नरके, सुचेता भामरे, दीपमाला चौरे, हेमांगी पाटील, मधुमती सरदेसाई आदिंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी उपस्थित होत्या.
बालसंगोपनासाठी दोन वर्षे रजा मिळावी
By admin | Published: March 09, 2017 1:31 AM