नाशिक : सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत आले. पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र दोन वर्षांनंतर पुन्हा झाकला जाऊन खंडग्रास चंद्रग्रहण शहरासह संपूर्ण देशभरात घडले.खगोलप्रेमींसाठी औत्सुक्याची आणि आवडीची बाब असलेला खंडग्रास चंद्रग्रहण यापूर्वी ४ एप्रिल २०१५ साली ईशान्य भारतातून बघावयास मिळाला होता. त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजून ५२ मिनिटाला पृथ्वीची सावली हळूहळू चंद्रावर पडण्यास सुरू झाली. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत आले. खंडग्रास चंद्रग्रहणाला वेधआरंभ दुपारी १२ वाजून ४४ मिनिटाला झाला. या ग्रहणाचा चंद्राला स्पर्श १० वाजून ५२ मिनिटाला होऊन रात्री १२ वाजून ४९ मिनिटाला मोक्ष झाला अर्थात पृथ्वीच्या सावलीतून चंद्राची सुटका झाली. ग्रहणाचा हा संपूर्ण कालावधीचा पर्व १ तास ५७ मिनिटाचा होता. जवळपास दोन तास खंडग्रास चंद्रग्रहण देशभरात पहावयास मिळाला. शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास ढगाळ हवामान व काही भागात रिमझिम पाऊस होत असल्यामुळे नागरिकांना चंद्रग्रहण बघता आले नाही. रात्री अनेकांनी खंडग्रास चंद्रग्रहण बघण्यासाठी घराच्या छतावर तसेच मोकळ्या भुखंडांवर धाव घेतली; मात्र ढगाळ हवामानामुळे खंडग्रास चंद्रग्रहण बघता आले नाही. विशेष म्हणजे या ग्रहणाविषयी सर्वसामान्यांना सायंकाळी माहिती कळाली. २०१९ मध्ये जुलै महिन्यात खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे.काय आहे खंडग्रास चंद्रग्रहणसूर्य-पृथ्वी-चंद्र हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्राचा प्रकाशमान भाग काही प्रमाणात झाकला जातो. परिणामी आपल्याला चंद्र काही अंश प्रकाशमान दिसतो आणि काहीअंशी चंद्रावर अंधार पडल्याचे जाणवते. या अवस्थेला खगोलीय भाषेत खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. तसेच अंशिक चंद्रग्रहण असाही शब्दप्रयोग केला जातो. याउलट स्थिती म्हणजे पृथ्वीची पूर्ण सावली चंद्रावर जेव्हा येते तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतो.चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो त्या कालावधीत कुठल्याही प्रकारे अन्नपदार्थ दूषित होत नाहीत किंवा त्यामध्ये जंतुंची वाढदेखील होत नाहीत. चंद्र व सूर्यग्रहणासंदर्भात विविध अंधश्रद्धा समाजात आहेत. त्याला वैज्ञानिकदृष्ट्याक ोणताही आधार नसल्याचे सिद्ध झाले आहे. - किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ
दोन वर्षांनी पडली चंद्रावर पृथ्वीची सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 12:42 AM