इंदिरानगर : परिसरात भुरट्या चोऱ्या, तसेच टवाळखोरांचा उपद्रव सातत्याने वाढत असून मंगळसूत्र चोरीच्या घटनादेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या चोरीच्या घटनांना कोणताही आळा बसलेला नसताना परिसरात गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या लुटीच्या घटना सुरू झाल्या आहेत. महिलांच्या हातातून मोबाइल हिसकावून पळ काढणे तसेच पर्स ओढून नेली जात असल्याच्या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इंदिरानगर परिसरात चोरीचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. गेल्या दोन दिवसात अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रकार सातत्याने घडल्याने महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. कलानगर चौकातून रात्रीच्या सुमारास रस्त्याने मोबाइलवर बोलत चाललेल्या युवतीच्या हातातील मोबाइल हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. दुचाकीवरून आलेल्या या चोरट्यांनी सदर युवतीच्या पाठीमागून येत तिच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. दुसरी घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. सकाळी ७.४५ च्या सुमारास मोदकेश्वर चौकातून जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील पर्स दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. या पर्समध्ये मोबाइल आणि काही पैसे होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या तीन दिवसांच्या अंतराने दुचाकीवरून आलेले चोरटे पर्स आणि मोबाइल पळवित असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
इंदिरानगर परिसरात लुटीचे प्रकार
By admin | Published: February 12, 2017 10:45 PM