पंचवटी : हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या काही दिवसांपासून मृत जनावरे फेकण्याचा प्रकार सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमाराला परिसरातील गोठेधारक मृत जनावरे पाटालगत फेकून देत असले तरी मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मृत जनावरांचा फडशा पाडण्यासाठी मोकाट कुत्री तुटून पडतात. हिरावाडी परिसरात अनेक गोठेधारक जनावरे पाळत असून, ते उघड्यावर जनावरांचे मलमूत्र टाकतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना आता त्यात आणखी भर म्हणून की काय हेच नागरिक मृत जनावरेदेखील पाटकिनारी फेकत असल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन पाटकिनारी पडलेल्या मृत जनावरांचे अवयव उचलून घ्यावेत तसेच मृत जनावरे फेकणाऱ्या गोठेधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.हिरावाडी पाण्याचा पाट दिंडोरीरोडला जोडला जात असल्याने अनेक नागरिक शॉर्टकट म्हणून या रस्त्याने ये-जा करत असतात. मात्र सध्या पाटालगत वाढलेल्या गाजरगवतात काही गोठेधारक चारचाकी वाहनातून मृत जनावरे उघड्यावर फेकून देतात. उघड्यावर मृत जनावरे फेकली जात असल्याने या भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
पाटकिनारी मृत जनावरे फेकण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:42 AM