नाशिक : अलीकडे राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचा, त्यांचे चरित्रहनन करून राजकीय बळी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे तरी आपल्याला यश मिळेल, असे अनेकांना वाटते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्ष आरोप केला. वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीअंती सत्य समोर येईल, असेही राऊत म्हणाले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी राऊत पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाविषयी विचारले असता, राऊत यांनी सत्य हे सत्य असल्याचे सांगून चौकशीअंती सर्व समोर येईल असे सांगितले. मध्यंतरी धनंजय मुंडे यांच्याबाबत असाच प्रयत्न करण्यात आल्यानंतर संबधित महिलेने तक्रार मागे घेतली आहे. राठोडप्रकरणी चौकशी केली जात असल्याचे राऊत म्हणाले.
राठोड हे विदर्भातील मोठे नेते आहेत, पक्षाचे मोठा आधार असलेले नेते असून, समाजाचे मोठे पाठबळ त्यांना आहे. त्यांच्याविषयी काेण काय मागणी करतो, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचे राऊत म्हणाले, तर आमदार नीलेश राणे यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यास महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.
आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे चुकीचे असल्याचेही राऊत म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करणे हा नागरिकांना अधिकार असल्याचे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. आज भाजप सत्तेत आहे, उद्या सत्ता गेली, तर त्यांनाही अनेकदा आंदोलने करावी लागतील. आंदोलने करूनच भाजप सत्तेपर्यंत पोहोचले आहे. आंदोलने कुणी थांबवू शकत नाही. भाजपची आंदोलनाची व्याख्या बदलली असेल, तर ते त्यांचे ढोंग आहे, अशी टीका राऊत यांनी केली. आंदोलकांचा आवाज तुम्ही का ऐकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपशी राजकीय मतभेद
राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू असत नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. भाजपशी आमचे राजकीय मतभेद आहेत, राजकीय शत्रुत्व नाही. त्यांचा सामना आम्ही विचारातून, निवडणुकीतून करू. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची परंपरा लाभली आहे. ही परंपरा सुसंस्कृत आणि संस्कृतीची आहे, असेही राऊत म्हणाले.