सुयोग जोशी
नाशिक - लोकसभा निवडणुकीतील विजय आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे.
ठाकरे यांच्या उपस्थितीत मनोहर गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ते शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधत मार्गदर्शन करणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांकडून विभागीय बैठका घेण्यात येणार आहेत. शालिमार चौकातील पक्ष कार्यालयात रविवारी (दि.३०) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपनेते सुधाकर बडगुजर यांचेसह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी सूर्यवंशी यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. यावेळी महानगरप्रमुख विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख,देवानंद बिरारी,महेश बडवे,गुलाब भोये,दिलिप मोरे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, युवासेना राज्य विस्तारक प्रवीण चव्हाण,मतदार यादी प्रमुख मसूद जिलानी,विभागप्रमुख नितीन जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिरासाठी येत आहेत. ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ या शिबिरात शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकदिवसीय संवाद शिबिरातून मार्गदर्शन करणार आहेत. शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून शहरात विभागनिहाय तर जिल्हाभर बैठका घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरात विभागनिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या असून ६ ते ९ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका होणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात शिबिरांच्या अनुषंगाने विविध समिती स्थापन करण्यात येणार आहेत.