लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छूकांचे युतीची घोषणा व जागांच्या वाटपाकडे लक्ष लागून असताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांचा मेळावा घेवून ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केल्याने निवडणुकीसाठी भाजपाबरोबर युती होणार नाही असा समज इच्छूकांमध्ये निर्माण झाला असून, मेळाव्यासाठी मुंबईला गेलेले इच्छूक नाशकात परतल्यानंतर जोमाने प्रचाराला लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तयारीला लागलेले आहेत. मेळावे, बैठका घेण्याबरोबरच भेटवस्तूंचे वाटप, सामाजिक,सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजनावर लाखोंचा खर्च करीत आहेत. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची वाट पहात असून, पक्षानेही सर्व इच्छूकांना कामाला लागण्याचे संदेश यापुर्वीच दिले आहेत. असे असले तरी, भाजपा बरोबर युतीची बोलणीही सुरू आहे. त्यामुळे नेमके काय होणार असा प्रश्न इच्छूकांना पडला आहे. युती झाली तर मतदार संघ सुटणार काय आणि सुटला तरी, उमेदवारी मिळणार काय अशा तिहेरी प्रश्नाभोवती ते गुरफटलेले असताना शनिवारी मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व इच्छूक उमेदवारांना पाचारण करून मेळावा घेतला व त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली. एकीकडे भाजपाबरोबर युतीची बोलणी सुरू असल्याचे सांगणाऱ्या ठाकरे यांनी सेना सर्व जागा लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र उभे केल्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाला आहे. त्यांच्या मते युती होण्याची शक्यता मावळल्यानेच ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांना स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयार राहण्याचा संदेश देण्यासाठी मेळावा घेतला आहे. युती होणारच आहे तर ठाकरे यांनी मेळावा न घेता मुंबईतूनच त्याची घोेषणा केली असती किंवा मेळाव्यातच तसे जाहीर करून ज्या इच्छूकांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना बंडखोरी वा प्रतारणा न करण्याचे आवाहन केले असते. मात्र ठाकरे यांनी यापैकी काहीच केले नाही. त्यामुळे युतीबाबत अजुनही अनिश्चितता असल्याचा संदेश ठाकरे यांनी मेळाव्याद्वारे दिला असून, त्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाले आहे. मेळावा आटोपल्यानंतर नाशकात परतलेल्या इच्छूकांनी तेच संकेत समजून जोरदार कामाला लागले आहेत.