मालेगाव- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'आज आपलं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही, तरीदेखील एवढी गर्दी आली आहे. ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं चोरू शकत नाही, भाड्याने आणता येत नाही. ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचा आशिर्वाद,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'माझ्यावरती प्रेम करणारा एकही माणूस तुम्ही नेऊ शकला नाही. याउलट तुमही तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारुन घेतला. हा शिक्का आयुष्यभर तुमच्या कपाळावर राहणार आहे. त्या निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. आयोगाला मोतीबिंदू झालेला नसेल, तर त्यांनी आधी खेडची आणि आता मालेगावची सभा पाहावी. आयोगाने जे-जे मागितलं, ते सगळं दिलं. तरीदेखील त्यांनी आपल्यावर अन्याय केला. ही शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केलीये, मिंध्याच्या वडिलांनी नाही. ज्यांना स्वतःच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.'
'देशात जे वातावरण सुरू आहे, ही लढाई माझ्या एकट्याची नाही तर लोकशाहीची आहे. मी आजही सांगतोय, हिंम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने मतदान मागतो. आज निवडणुका घ्या. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला. त्या आईच्या कुशीवर वार करणारे तुम्ही आहात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.