नाशिक : केंद्रीय विद्यापीठ आयोगाद्वारे मुक्त विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदवी अभ्यासक्रमही अडचणीत आला असून, पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना यूजीसीने केली आहे. परंतु, यूजीसीने केलेली ही सूचना निराधार असून, मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी राज्य सरकारकडून कायदेशीर तरतूद करून विद्यापीठात कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाला कायदेशीर आधार असून यूजीसीने केलेल्या सूचनेच्या विरोधात मुक्त विद्यापीठातर्फे अपील करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतल्याची माहिती कुलगुरू ई. वायुनंदन यांनी मंगळवारी (दि.१६) ‘लोकमत’शी बोलताना दिली.दूरस्थ शिक्षण प्रणालीतून कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळत असल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची या अभ्यासक्रमामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे़ परंतु गेल्या आठवड्यापूर्वीच दूरस्थ शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी कृषी अभ्यासक्रम बंद करावे, अशा सूचना करणारे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला असून, कृषी प्रशिक्षण देणा-या या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाला एक वेगळी ओळख मिळाली असून समाजालाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, अशा कृषी अभ्यासक्रमांना बंद करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र मुक्त विद्यापीठ राज्याच्या नियमानुसार चालणारे आहे. विद्यापीठात निर्मिती करतानाच राज्यातील कृषी क्षेत्राचा विचार करून कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठ कृषी अभ्यासक्रम कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही. त्यासाठी आज युजीसीकडे अपील करीत आहोत.- प्रा. ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
कृषी पदवी वाचविण्यासाठी ‘मुक्त’चे यूजीसीत अपील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:26 AM