नाशिक : सोयीच्या बदलीसाठी आॅनलाइनमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाले आहेत. मात्र, या शिक्षकांना न्याय मिळत नसल्याने या शिक्षकांनी आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विस्थापित शिक्षक आपल्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी जिल्हा परिषदेपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आपली कैफियत मांडत आहेत. खोटारड्या शिक्षकांची कागदपत्रांसह माहिती पूरवूनही जिल्हा परिषदेकडून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येत नसल्याने विस्थापित शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांना सोयीच्या जागा मिळाल्या, मात्र असे करताना त्यांनी शासनाची फसवणूक केली याकडे मात्र जिल्हा परिषदेसह विभागीय आयुक्तदेखील दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विस्थापित शिक्षकांनी केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी या शिक्षकांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.
अखेर विस्थापित शिक्षकांचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:26 AM