अल्ट्रासाउंड (सोनोग्राफी) शाप की वरदान, यावरील चर्चा करण्यात आली. त्यात लिंगभेद चाचण्यांविषयी केलेला ऊहापोह निश्चितच चिंतेचा विषय आहे; पण त्याव्यतिरिक्त सोनोग्राफीचे नानाविध उपयोग दिवसेंदिवस वेगाने विस्तारत आहेत, त्यामुळे सोनोग्राफीकडे केवळ एकांगी दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, यासाठी हा लेखप्रपंच.‘टीव्हीवरची तपासणी’ असे अनेकदा समजावून सांगावे लागणारी सोनोग्राफी (अल्ट्रासाउंड, वरॠ, अल्ट्रासोनोग्राफी) आज गावोगावी पोहोचली आहे. सोनार तंत्राचा वैद्यकीय क्षेत्रामधील वापर दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला. त्यानंतर आज सोनोग्राफी तंत्रात वेगाने प्रगती होऊन, प्रगत ‘कलर डॉपलर’ सोनोग्राफी, ‘त्रिमितीय’ ‘चौमितीय’ सोनोग्राफीदेखील उपलब्ध झाल्या आहेत.सोनोग्राफीचे प्रसूतीशास्त्रात उपयोग सर्वश्रुत आहेतच, तसेच सोनोग्राफीत वापरल्या जाणाºया ध्वनिलहरीचे कुठलेही गंभीर दुष्परिणाम गर्भावर आजतागायत आढळून आलेले नाहीत. त्यामुळे गर्भारपणात सोनोग्राफीला जास्त लोकमान्यता मिळाल्याचे दिसून येते. गर्भारपणाला तिन्हीही टप्प्यांमध्ये सोनोग्राफीचे विविधांगी उपयोग होतात.१) पहिला टप्पा (एक ते तीन महिने)गर्भाचे अचूक वय, गर्भाची जीवनावस्था, हृदयाची हालचाल, जुळ्या-तिळ्यांची शक्यता, गर्भपिशवीच्या व त्या आजूबाजूच्या गाठींचे अचूक निदान होते.२) दुसरा टप्पा (तीन ते सहा महिने)दुसºया टप्प्यातील सोनोग्राफी अतिमहत्त्वाची व प्रत्येक गर्भारपणात अत्यावश्यक आहे. ही तपासणी साधारणत: १८ ते २२ आठवड्यांदरम्यान करतात. त्यात प्रामुख्याने बाळातील विकृती व जन्मजात दोष शोधता येतात. तसेच बाळाची वाढ, वारेची जागा, गर्भाची हालचाल इत्यादीदेखील अभ्यासता येतात. सशक्त व अव्यंग पुढची पिढी निर्माण करणे, हा या तपासणीचा सर्वांत मोठा उद्देश होय. बाळाची अनेक प्रकारची व्यंगे सोनोग्राफीद्वारे अचूक निदानात होतात. उदाहरणार्थ : (अ) मेंदू व मज्जारज्जूतील व्यंग-गर्भाच्या डोक्यातील वाढलेले पाणी मेंदूच्या विविधगाठी. (ब) फुफ्फुसातील, हृदयातील व छातीच्या पडद्यातील दोष. (क) जठराची, अन्ननलिकेतील व्यंगे. (ड) मूत्रसंस्थेचे दोष-मूत्रपिंडाची अपूर्ण वाढ, पॉलिसिस्टीक किडनी.३) तिसरा टप्पा (सहा ते नऊ महिने)या टप्प्यात प्रामुख्याने बाळाची गर्भाशयातील स्थिती पायाळू की आडवे आहे, याचा अंदा येतो. तसेच गर्भजलाचे प्रमाण, वारेची जागा, बाळाचे वजन इत्यादी महत्त्वाच्या बाबी प्रसूतीच्या दृष्टीने आधीच माहिती होतात.प्रसूतिशास्त्राप्रमाणेच पोटाच्या अनेकविध विकारांमध्ये सोनोग्राफी अत्यंत उपयुक्त आहे. त्याद्वारे उदरात घडणाºया वेगवेगळ्या घटनांची अचूक माहिती मिळते. उदाहरणार्थ (अ) यकृताचे विकार, यकृतदाह किंवा काळीव कुठल्या प्रकारची आहे हे समजते. यकृताचा कर्करोग व यकृतात पसरणाºया कर्करोगाच्यागाठी अचूक निदानात दिसतात.(ब) ल्पीहा (पाणथरीचे) विकार : ल्पीहेची वाढ व जंतू संसर्ग लक्षात येतो.क) स्वादूपिंड : स्वादूपिंडाच्या दाहामुळे होणारी असह्य पोटदुखी निदानीत होते. तसेच या दाहात निर्माण होणाºया गाठी व पोटात होणारे पाणी यांचा मागोवा घेता येतो.ड) मूत्रसंस्था : मूत्रपिंडाला असलेली सूज विविध प्रकारचे मूत्रखडे (मुतखडे) इत्यादींचे अचूक निदान होते. तसेच, मूत्रसंस्थेचा क्षयरोग व कर्करोगाचे निदान होण्यास मदत होते. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढही दिसते व त्याचा मूत्राशयावर पडणारा दाब समजतो.इ) गर्भाशय व बीजाशयाचे विविध आजारही सोनोग्राफीद्वारे समजतात. उदाहरणार्थ गर्भाशयाच्या गाठी बीजाशयाच्या गाठी गर्भाशयाचा व बीजाशयाचा कर्करोगावरील निदानांबरोबरच इतरही काही पोटाच्या विकारांवर सोनोग्राफी उपयुक्त ठरते. पोटात होणारे पाणी पोटाचा क्षयरोग आतड्यांमधील अडथळे इत्यादी.ई) वंध्यत्वामध्ये सोनोग्राफीद्वारे स्त्रियांमधील गर्भाशयातील आजार लक्षात येतात. तसेच बिजाशयातील बीजांचे दोष व पुरुषांमध्ये वृषणांची सोनोग्राफी करून त्यातील त्रुटी शोधता येतात.आधुनिक सोनोग्राफीचे लहान मुलांच्या तपासणीतही आता नवीन दालन उघडले आहे आणि ही तपासणी सर्व वयोगटांतील मुलांसाठी अत्यंत सुरक्षित व खात्रीशीर होय. उदाहरणार्थ (अ) सोनोग्राफी : लहान मुलांमध्ये टाळू उघडा असेपर्यंत (साधारणत: १६-१८ महिन्यांपर्यंत) मेंदूची सोनोग्राफी करून त्यात वाढलेले पाणी व रक्तस्त्राव, पोटदुखीतही सोनोग्राफी पित्ताशयातील व मूत्र संस्थेतील खडे, आतड्यांतील अडथळे, स्वादूपिंडदाह, यकृतदाह इत्यादी बघण्यासाठी उपयुक्त आहे.शरीरातील ज्यांची मूर्ती लहान, पण कार्य महान अशा लहान अवयवांमध्येही सोनोग्राफीद्वारे अचूक माहिती मिळते ती अशी; (अ) डोळ्यांची सोनोग्राफी : यात मोतीबिंदू, नेत्रभिंगाचे व नेत्रपटलाचे निसटणे, अंतर्गत रक्तस्त्राव इत्यादी दिसतात. (ब) थायरॉइड ग्रंथीची सूज (गलगंड) पाण्याच्या व कर्करोगाच्या गाठी. (क) लाळग्रंथीची सूज, विकार लक्षात येतात. (ड) स्तनांमधल्या पाण्याच्या व कर्करोगाच्या गाठी, विशेषत: तरुण स्त्रियांमध्ये तपासणीत उपयुक्त. (इ) स्नायूभंग, स्नायूंच्या दुखापती निदानात होतात.कलर डॉपलर या अत्याधुनिक सोनोग्राफीद्वारे शरीरातील रोहिण्यांची व निलांची तपासणी करून त्यातील अडथळे व शस्त्रक्रियांची यशस्वीता तपासता येते. प्रसूतीशास्त्रात मातेकडून बाळाला होणारा रक्तपुरवठा व त्यातील घट लक्षात येते. हृदयरोगामध्ये हृदयातील छिद्रे व विविध हृदयविकार लक्षात येतात.एकंदरीतच सोनोग्राफी म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राला मिळालेले एक वरदानच आहे. त्याचा सुयोग्य वापर उद्याच्या निरोगी भविष्याकाळासाठी आवश्यक आहे. त्यासाठी ही महत्त्वपूर्ण तपासणी तज्ज्ञ, अनुभवी सोनोलॉजिस्ट किंवा रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांकडून करणेही तितकेच आवश्यक आहे.
- डॉ. मंगेश रंगनाथराव थेटेरेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट,