नाशिक : औरंगाबाद येथील उमंग ग्रुपतर्फे ११ महिला चित्रकारांची ‘बेटी बचाव, बेटी पढावो’ विषयावर १५० चित्रे असलेल्या अनोख्या चित्रप्रदर्शनास शनिवारी (दि.२४) कुसुमाग्रज स्मारकात दिमाखात प्रारंभ झाला. याप्रसंगी उर्मिला घाणेकर, ज्येष्ठ चित्रकार बाळ नगरकर, महाराष्टÑ चेंबरच्या सोनल दगडे, नवज्योती महिला मंडळाच्या मंजुषा कुलकर्णी, राजे पाटेकर यांच्या हस्ते दीपपज्वलन करण्यात आले. प्रदर्शन २६ मार्चपर्यंत ते सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत चालणार आहे. प्रदर्शनात निसर्गचित्र व मॉडर्न आर्ट फॉर्ममधील चित्रांचा समावेश आहे. ज्योती चोटलानी, प्रीती बोरा, कमला शर्मा, सोनिया खोडके, मोना सेठी, वैदेही कुलकर्णी, श्रृती कुलकर्णी, शलाका गंगवाल, पूजा खन्ना, सदिच्छा कलंत्री या महिला चित्रकारांनी प्रदर्शनात ‘बेटी बचाव’ विषयावर एकाहुन एक सरस चित्रे सादर केली आहेत.कलेच्या आस्वादाची संधीउमंग ग्रुपतर्फे २०१४ पासून देशभरातील विविध शहरांमध्ये व छोट्या खेड्यांमध्ये विविध सामाजिक विषयाला अनुसरुन आवर्जून चित्रप्रदर्शने भरविण्यात आली आहेत. यातून गावागावात कलादृष्टी विकसित करणे, कलेचा आस्वाद घेण्याची संधी देणे हे हेतू साध्य होतात. ही चित्रे रुग्णालयांना भेट दिली जातात. याआधी पर्यावरण, आध्यात्मिक विषयावर प्रदर्शने तसेच ज्येष्ठ अभिनेत्री स्व. स्मिता पाटील स्मृतिदिनी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनातील काही चित्रे महिला व बाल रुग्णालयांना भेट म्हणून देण्यात येणार आहे.
‘उमंग’चे बेटी बचाव चित्रप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:41 AM