नाशिक : नासा व्यावसायिक समूहातर्फे २०१९ वर्षाच्या दिनदर्शिकेतून नाशिकचे रहिवासी असलेल्या अरुण खत्री यांची चार वर्षीय नात उमा भावे हिने गगन भरारी घेतली आहे. अवघ्या चार वर्षांची उमा ही या स्पर्धेतील सर्वांत कमी वयाची स्पर्धक असून, तिने रेखाटलेली रॉकेटची कलाकृती नासातर्फे १८ डिसेंबरला जाहीर केलेल्या दिनदर्शिकेत मे महिन्याच्या पानावर झळकली आहे. तिची आई सर जे. जे. स्कूल आॅफ आटर््सची पदवीधर असून, युनायटेड स्टेट्समधील सराव डिझायनर आणि तिचे वडील प्राध्यापक आहेत.जगभरातील मुला-मुलींमध्ये अंतराळ, विज्ञानाविषयी कुतूहल, जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) अंतराळ विषयावर आधारित चित्रे नासाच्या कमर्शियल कॅलेंडरसाठी मागावली होती. या कॅलेंडरमध्ये नाशिकचे रहिवासी अरुण खत्री यांची नात मूळ नाशिकची परंतु, सध्या अमेरिकेत राहणाऱ्या उमा भावे या चार वर्षीय मुलीचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. अंतराळात वास्तव्यास असणाºया अंतराळवीरांचे आयुष्य, त्यांचे काम मुलांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने कॅलेंडरची निर्मिती करण्यात येते. भावी शास्त्रज्ञांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी आणि मुलांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणितात रुची निर्माण व्हावी हाही या दिनदर्शिकेचा उद्देश असून, या स्पर्धेसाठी जगभरातील हजारो मुलांनी त्यांची चित्र कलाकृती नासाकडे पाठविली होती. त्यातील निवडक १२ चित्रे या कॅलेंडरमध्ये प्रकाशित करण्यात आली असून, बारा महिन्यांच्या बारा पानांवर अंतराळ विषयाची चित्रे असून, या सर्वांमध्ये सर्वांत लहान वयाच्या उमाने ‘ब्लास्ट आॅफ टू स्पेस’ विषयावरील चित्र सादर करीत नासाच्या दिनदर्शिकेत स्थान पटकावले आहे. उमाची आई जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबईची पदवीधर असून, अमेरिकेत डिझायनर आहे, तर वडील प्राध्यापक आहेत.
‘नासा’च्या कॅलेंडरवर उमाचे चित्र झळकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:08 AM