नाशिक: झरा म्हटला की जमिनीतुन येणारे थंड नितळ पाणी...मात्र नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणजवळ असलेल्या पिंपळसोंड या आदिवासी गावाच्या राखीव वनाला लागून असलेल्या देवी मंदिराजवळच झऱ्यातून दिवसाचे २४ तास बारामाही गरम पाणी वाहते. हा झरा आदिवासी बोलीभाषेत 'ताता पाणी' नावाने परिचित आहे. आदिवासी कोकणी भाषेत 'ताता' या शब्दाचा अर्थ गरम असा होतो.नाशिक पुर्व वनविभागाच्या हद्दीतील हे गाव तसे बघितले तर महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर आहे. पावसाळ्यात हा भाग हिरवाईने नटलेला पहावयास मिळतो आणि येथून जवळच असलेला साखळचोंड धबधबासुध्दा नागरिकांना आकर्षित करतो. पावसाळ्यात या परिसरात निसर्गाची मुक्त हस्ते उधळण बघावयास मिळते. येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांची पारणे फेडणारे असते. पिंपळसोंड या आदिवासी पाडा 'इको-टुरिझम'द्वारे समृध्द करण्याचा पुर्व वनविभागाचा मानस आहे.
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्र अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. गुजरात राज्याची सीमा समीप असलेल्या या भागाला लागूनच गुजरातच्या वघई, वाझदा, डांग आणि अहवाच्या जंगलाचा परिसर आहे. उंबरठाणमधील बर्डीपाडा वनउपच नाक्याजवळ महाराष्ट्र राज्याची हद्द संपते. या नाक्यापासून अगदी आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर वघई आहे. उंबरठाण वनपरिक्षेत्र साग, खैरसारख्या मौल्यवान वृक्षसंपेदेच्या जंगलासाठक्ष ओळखला जातो. या वनपरिक्षेत्राचे १२ हजार ३०४ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. पिंपळसोंड, रगतविहीर, हाडकाईचोंड आणि उंबरठाण असे चार राऊंड आहेत. या चार राऊंडमध्ये एकुण २१ बीट तयार करुन देण्यात आले आहे. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांचे पथक वन-वन्यजीव संवर्धन तसेच आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या वन खात्याच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
पिंपळसोंड या आदिवसासी पाड्याचा विकास वन पर्यटनद्वारे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अत्यंत दुर्गम आदिवासी भाग असलेल्या या परिरसरातील वन आणि वन्यजीव संवर्धनाकरिता स्थानिक लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. यासाठी सातत्याने या भागातील विविध समुह ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये वनविभागाकडून संयुक्त वन व्यवस्थापन समित्या गठीत करण्यावर भर देत आहेत. या समित्यांच्या माध्यमातून स्थानिकांचा विश्वास संपादन करत वनविभागाकडून येथील साग, खैराची मौलिक वृक्षसंपदा सुरक्षित करण्याकरिता विशेष प्रयत्नशील आहेत. गुजरातस्थित तस्करांच्या टोळ्यांकडून संधी मिळताच उंबरठाण परिसरातील जंगलांमध्ये घुसखोरी करुन साग, खैराची अवैध तोड केली जाते. या अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्याकरिता स्थानिक आदिवासींचा वनविभागाला पाठिंबा मिळणे अत्यंत गरजेचे आहे, तरच या भागातील जंगल सुरक्षित राहुन कायमस्वरुपी नागरिकांना जंगलाद्वारे विविध फायदे मिळतील. कमी शिक्षण, गरीबी, रोजगाराची वाणवा, पावसाळ्याचे चार महिने वगळता अन्य ऋतुत शेती बेभरवश्याची ठरते. यामुळे आदिवासींच्या हातांना रोजगार मिळावा याकरिता पुर्व वनविभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.
गोंदुणे एक आदर्श पाडाउंबरठाणमधील गोंदुणे हा एक आदर्श आदिवासी पाडा आहे. येथे सर्वप्रथम संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. या गावाने नैसर्गिक जंगलाचे स्वयंस्फुर्तीने संरक्षण करत चांगल्याप्रकारे जंगल राखले आहे. येथील आदिवासी नागरिकांनी वनविभागाच्या हाकेलो प्रतिसाद देत त्यांच्या हाताता हात घालून स्वत:चा सर्वांगीण विकास साधण्याच्यादृष्टीने दमदार पाऊल टकाले असून अन्य आदिवासी पाड्यांना गोंदुणेचे रहिवाशी नक्कीच प्रेरणा देतात.