उमराणे : येथील विद्युत वितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रात अनेक दिवसांपासून अनियमित विद्युत पुरवठा होत असून पाच एमव्हीएचे रोहित्र वीज वितरण कंपनीकडून बसविण्यात आले. येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे विद्युत उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून सांगवी, कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, वऱ्हाळे, खारीपाडा आदि गावांना फिडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. परंतु या उपकेंद्रावरील उपलब्ध होत असलेला वीजपुरवठा मागणीपेक्षा कमी असल्याने उमराणेसह परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. परिणामी अनियमित भारनियमन व त्या व्यतिरिक्त वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा शेतकरी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. ही बाब लक्षात घेता जाणता राजा मित्रमंडळाच्या शिष्टमंडळाने मालेगाव येथे वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय आडे यांची भेट घेतली व समस्या सोडविण्यासाठी उमराणे उपकेंद्रात पाच एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी केली. त्यानुसार तत्काळ रोहित्र बसविण्यात आले असून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.(वार्ताहर)
उमराणे विद्युत उपकेंद्रास मिळाले अधिक क्षमतेचे रोहित्र
By admin | Published: December 17, 2015 11:28 PM