उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत मका आवकेत काही अंशी घट आली असून, त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. मंगळवार (दि.१८) रोजी सर्वोच्च १८५० रुपये क्विंटल दराने मका विकला गेला.
येथील बाजार समितीत कांद्यापाठोपाठ भुसार मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. त्यामुळे येथे मकाविक्रीस गर्दी होते. चालूवर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस असल्याने मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे आगामी काळात बाजारभाव वाढतील की नाही, या भीतीपोटी बहुतांशी शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच १४०० ते १६०० रुपये बाजारभावातच मकाविक्री करणे पसंत केले होते. त्यानंतर महिनाभरात सुधारणा होऊन १७०० रुपयांपर्यंत विकला गेला होता. हा बाजारभाव साधारणतः दीड ते दोन महिने स्थिर असल्याने या काळातही मोठ्या प्रमाणात मका विकला गेला. त्यामुळे सध्यस्थितीत ठरावीक शेतकऱ्यांकडेच मका उरला असून ते शेतकरी आपापल्या सवडीने, तसेच बाजारभाव वाढीच्या अपेक्षेने टप्प्या टप्प्यात विक्रीस आणत असल्याने आवकेत घट आल्याचे चित्र आहे. परिणामी, गत सप्ताहाच्या तुलनेत मका बाजारभावात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली असून बाजारभाव कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त १८५० रुपये, तर सरासरी १७०० रुपयांपर्यंत होते.