येवला : थोर सेनांनी, सेनापती तात्या टोपे यांचे येवल्यात साडेदहा कोटी खर्चाचे भव्य स्मारक निर्माण होत आहे. हे स्मारक नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या पालखेड कॉलनीलगत व्हावे यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीने कंबर कसली असून, जागेबाबत समन्वय घडावा यासाठी समितीने आयोजित केलेल्या बैठकीत स्मारकाच्या जागा बदलाबाबत एकमत झाले. पालकमंत्री यांनी ठरवले तरच स्मारकाच्या जागा बदलाची प्रक्रिया होईल, असा सूर नगराध्यक्षासह सर्वांनी काढल्याने आता स्मारकाच्या जागा बदलाचा चेंडू गिरीश महाजन यांच्या कोर्टात टोलवला गेला. समन्वयाने पाठपुरावा करण्याचे धोरण या बैठकीत ठरवण्यात आले. येवला मर्चण्ट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. माणिकराव शिंदे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, उद्योगपती सुशील गुजराथी, संघचालक मुकुंदनाना गंगापूरकर, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, सेनानेते संभाजी पवार, संस्कृतिकार प्रभाकर झळके, समिती अध्यक्ष आनंद शिंदे, श्यामसुंदर काबरा होते. प्रारंभी सेनापती तात्या टोपे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष समितीचे सरचिटणीस भोलानाथ लोणारी यांनी केंद्र व राज्य शासनाने सेनापती तात्या टोपे स्मारकासाठी साडेदहा कोटीची योजना दिली. पालिकेने शहर पाणीपुरवठा साठवण तलावालगतची जागा स्मारकासाठी निश्चित केली व तसा ठरावही केला. शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून सन २०५० पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेऊन पुढच्या पाणीटप्पा नियोजनासाठी पालिकेने स्मारकासाठी प्रस्तावित केलेल्या जागेची गरज पडणार आहे. ही नियोजित जागा बाभूळगाव शिवारात असल्याने पाण्यासाठी दोन किमी पाइपलाइन लागेल. अखंड विजेच्या खर्चासह पथदीप लावावे लागतील यासाठी खर्चदेखील करावा लागेल. वर्दळ नसलेला हा परिसर निर्मनुष्य असून, सुरक्षित नसल्याचे सांगितले. हे स्मारक नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर जलसंपदा विभागाच्ग्या जागेत व्हावे, अशी भूमिका मांडली. राष्ट्रवादीच्या नगरसेवक शीतल शिंदे यांनी स्मारकासाठी जलसंपदा विभागाची जागाच योग्य असल्याचे सांगून येवल्याच्या वैभवात भर घालणारे तात्या टोपे यांचे स्मारक येथेच व्हावे यासाठी पालिकादेखील दर आये दुरुस्त आये म्हणत आपला ठराव बदलण्याची कृती करेन, असे सांगितले. नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी निधी परत जाऊ नये म्हणून हा ठराव वरिष्ठांच्या सांगण्यावरून केला. जलसंपदा विभागाची जागा मिळत असल्यास सोनेपे सुहागा अशी टिप्पणी करून स्मारकाच्या जागा बदलासाठी सहमती दर्शविली. बैठकीस राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, सचिन शिंदे, रूपेश लोणारी, श्याम जावळे, प्रमोद सस्कर, अमजद शेख, शफीक शेख, निसार लिंबुवाले, रूपेश दराडे, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचलन राहुल लोणारी यांनी केले. आभार गणेश खळेकर यांनी मानले.परस्परांना विश्वासात घ्यावे...पालकमंत्री व शासन स्मारकासाठी जागा द्यायला तयार असेल तर आम्ही समितीबरोबर आहोत असल्याचे मत नगरसेवक रु पेश लोणारी यांनी मांडले. सेना नेते संभाजी पवार यांनी पालिकेने ठराव केलेली जागा अयोग्य असून, समितीने सुचवलेली जलसंपदा विभागाच्या जागी स्मारक होण्यासाठी शिवसेना समितीबरोबर असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मुकुंद गंगापूरकर यांनी परस्परांना विश्वासात घेऊन सर्व दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन केले.
समन्वय बैठकीत जागा बदलाबाबत एकमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:38 AM