नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कानडे मारुती लेनमधील विघ्नहर्ता संकुलात विनापरवाना वाणिज्य वापर करणाऱ्या दहा दुकानांना शुक्रवारी (दि. ११) सील ठोकले. सदर संकुलाला लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगसाठी परवाना देण्यात आलेला होता. परंतु याठिकाणी होलसेल मालाची विक्री करणारी दुकाने थाटण्यात आलेली होती. महापालिकेच्या पश्चिम विभागातील अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी संबंधित दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली. कानडे मारुती लेनमधील विघ्नहर्ता संकुलातील दहा दुकानांना विनापरवाना वाणिज्य वापर सुरू असल्याप्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाने २९ आॅक्टोबर २०१६ रोजीच अंतिम नोटीस बजावली होती. परंतु, नोटीस देऊनही संबंधितांकडून वाणिज्य वापर सुरूच होता. पालिकेच्या पथकाने विनापरवाना वाणिज्य वापर करणाºया रवि बॅग हाऊस, साखरिया सोळंकी, रूपाली जनरल स्टोअर्स, जयशंकर ट्रेडर्स, माया जनरल स्टोअर्स, कलश आर्ट तसेच रूपाली नॉव्हेल्टिजचीच तीन दुकाने सील केली. सदर दुकानांमध्ये होजिअरी, प्लॅस्टिक वस्तूंची होलसेल विक्री केली जाते. महापालिकेच्या पथकाने मालासह दुकानांना सील ठोकले. महापालिकेने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांची धांदल उडाली. काही व्यावसायिकांनी अटकाव करण्याचाही प्रयत्न केला. परंतु पालिकेने आपली कारवाई पूर्ण केली.फेरीवाल्यांवर अनेक ठिकाणी कारवाईमहापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कानडे मारुती लेन, वकीलवाडी व कॅनडा कॉर्नर परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई केली. कानडे मारुती लेनमधून जवळपास एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले तसेच वकीलवाडी परिसरात तेथीलच व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करत उभारलेले फलकही जप्त करण्यात आले.
विनापरवाना वाणिज्य वापरदहा दुकानांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:34 AM