लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात इमारतींच्या तळमजल्यासह टेरेसवरील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीच्या सभेत नगररचना विभागाला दिले आहेत. येत्या दीड महिन्यात त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. स्थायी समितीची सभा शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभापतींनी शहरातील इमारतींमधील बेसमेंट आणि टेरेस यांचा अनधिकृत वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर ठिकाणी अनधिकृत बांधकामे करत व्यावसायिक वापर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश सभापतींनी नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांना दिले. तसेच येत्या दीड महिन्यात त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, पी. बी. चव्हाण यांनी याबाबतचा असा सर्व्हे अद्याप केला नसल्याचे सांगत नगररचना विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले. परंतु, सभापतींनी त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी देत सदर सर्व्हेचा अहवाल स्थायीला सादर करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान, सभेत अशोका मार्ग येथील ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्याच्या भूसंपादनाकरिता ५१ लाख ६३ हजार रुपये उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यास मान्यता देण्यात आली तर मानधनावरील कर्मचारी नियुक्तीचे प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आले. एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समिती (अंब्रेला सोसायटी)च्या प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानधनावरील मुदतवाढीचा प्रस्तावही तहकूब ठेवण्यात आला.
तळमजल्यासह टेरेसवरील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे
By admin | Published: June 25, 2017 12:00 AM