नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंचवटी विभागातील आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा-नांदूर रोडवर मोहीम राबवित अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. या कारवाईत पत्र्याचे ३१ शेड आणि ४० ओटे हटविण्यात आले. याशिवाय, सामासिक अंतरातील पक्क्या बांधकामांवरही हातोडा चालविण्यात आला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. २१) आपला मोर्चा आडगाव शिवाराकडे वळविला. यावेळी हॉटेल जत्रा-नांदूर रोडवरील लखन सोसायटी येथील दुकानांच्या समोरील शिवतारा क्लिनिक, साई विद्या आटर््स, सुनील स्टील अप्लायन्सेस, आर्या ज्वेलर्स, सिद्धेश्वर, दीप सर्व्हिसेस, ओम गॅरेज, ओम हार्डवेअर, यशवंत जनरल स्टोअर्स, महेश ज्वेलर्स, स्वामी होजिअरी रेडिमेड गारमेंट्स, देवेश फोटो, मंगल इलेक्ट्रॉनिक्स, सद्गुरु स्टील ट्रेडर्स, शंभू हार्डवेअर यांचे पत्र्याच्या शेडचे अनधिकृत बांधकाम व ४० ओटे हटविण्यात आले. याशिवाय पथकाने आडगाव शिवारातील वृंदावननगरातील विनायक लक्ष्मी अपार्टमेंट येथील सामासिक अंतरातील पत्र्याची सहा दुकाने व सामासिक अंतरातील कार्यालयाचे पक्के बांधकाम उद्ध्वस्त केले.जत्रा हॉटेल शेजारील उमिया एन्टरप्रायजेस येथील पत्र्याचे दुकानाचे शेड, शरयू पार्कयेथील ए वन चिकन सेंटर/सरकार मटन व चिकन सेंटर यांच्याही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. सदर कारवाई अधीक्षक शैलजा माळोदे, एम. डी. पगारे, नगररचना विभागाचे अभियंता संतोष जोपुळे यांच्या उपस्थितीत अतिक्र मण विभागाच्या दोन पथकांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.व्यावसायिकांची धावपळमहापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केल्यानंतर परिसरातील व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. काही व्यावसायिकांनी शेडखाली थाटलेला माल उचलून घेतला, तर काहींनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची तयारी सुरू केली. महापालिकेची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे.
आडगावातील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:15 AM