नाशिक : सिडकोतील रस्त्यांवर ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर उभे राहिलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी लाल खुणा करण्याचे काम सुरू आहे. घरांमधील वाढीव बांधकामांना हात घातलेला नाही. मार्किंगच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत हटविली जाणार असल्याचा पुनरुच्चार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून महापालिकेमार्फत सिडकोतील वाढीव बांधकामांवर लाल फुल्या मारण्याचे काम सुरू होते. महापालिकेकडून अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई सुरू होण्याच्या भीतीने नागरिकांकडून या मार्किंगला विरोध करण्यात आला होता, तर विभागीय अधिकाऱ्यांना घेरावही घालण्यात आला होता. सिडकोतील वाढीव बांधकामावरील कारवाईबद्दल नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन रोष व्यक्त केला जात असतानाच आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी (दि.२४) भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. सदर कारवाई तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना फोन करून कारवाईस स्थगिती देण्याचे आदेशित केल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली होती. त्यामुळे, सिडकोतील नागरिकांना दिलासा लाभला असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कारवाईस स्थगिती आदेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिडकोतील ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारीवरूनच रस्त्यावरील ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मार्किंगचे काम सुरू करण्यात आले होते. केवळ रस्त्यावर अडथळा ठरणाºया बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. घरांमधील बांधकामे हटविली जातील, असे म्हटलेले नाही. वाढीव बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांनी ३१ मेपर्यंत कम्पाउंडिंगसाठी प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर नियमानुसार कारवाई होईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.आदेश कुठे तो दाखवा !आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना फोन करून कारवाईस स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचे म्हटले होते. त्याबाबत आयुक्तांकडे विचारणा केली असता, त्यांनी स्थगिती आदेश कुठे आहे तो दाखवा? असे आव्हान देत त्याबाबत ज्यांनी सांगितले त्यांनाच विचारा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
सिडकोतील रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे हटणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:49 AM