देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या वतीने बाजार भागासह लॅमरोड, आनंदरोड आदि ठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृत टपऱ्या आदि अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ झाला.छावणी परिषदेच्या वतीने शासकीय व सार्वजनिक जागेवर, रस्त्याच्या कडेला असलेले टपऱ्या व आदि विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यास मंगळवारी प्रारंभ केला. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागाचे अधिकारी, ३० कर्मचारी, ३ ट्रक आदि लवाजम्यासह दुपारी ३ वाजता अतिक्रमण विरोधी मोहिमेला प्रारंभ झाला. आनंदरोड, लॅमरोड, सदर बाजार, रेस्ट कॅम्परोड आदि भागातून ७ टपऱ्या, ६ हातगाड्या, रस्त्यावरील विविध वस्तू विक्रेत्यांचा मुद्देमाल जप्त करून रस्ते मोकळे करण्यात आले. तसेच सदर बाजार भागात दुकानांच्या बाहेर विक्रीसाठी लावण्यात आलेले कपडेदेखील जमा करण्यात आले. अतिक्रमणधारकांना नोटीस बजावूनही त्यांनी अतिक्रमण न काढल्याने ही कार्यवाही करण्यात आली. सदर अतिक्रमण विरोधी मोहीम यापुढेही १५ दिवस सुरू राहणार असल्याचे छावणी अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी सतीश भातखळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
अनधिकृत टपऱ्या हटविल्या
By admin | Published: April 20, 2017 12:39 AM