मुंबई नाका ते शिवाजीवाडी नासर्डी नदीचे पात्र दिवसागणिक वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे अरुंद होत चालले आहे. भारतनगर व शिवाजीवाडी या परिसरात सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बोटाला मोजण्याइतकी घरे आणि झोपड्या होत्या, परंतु शहरातून विविध भागातून अतिक्रमण विभागाने झोपड्या हटवल्या की त्यांचे पुनर्वसन या भागात केले जात असल्याने या ठिकाणी शेकडोच्या संख्येने झोपड्या वसल्या आहेत. मनपाच्या सुमारे सहा एकर जागेत सुद्धा संपूर्णपणे झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. मुंबई नाका ते शिवाजीवाडी या दरम्यान असलेल्या नासर्डी नदीच्या पात्रात सर्रासपणे ठिकठिकाणी भर टाकून घरे तयार केली जात असून, त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन पावसाळ्यात नदीचे पाणी शिवाजीवाडी, भारतनगर या परिसरात शिरते. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या या रहिवाशांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान दरवर्षी होते. महापालिकेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही नदीपात्रात घरे बांधणाऱ्यांना फक्त नोटीस बजावून सोपस्कार केला गेला आहे; परंतु अद्यापपर्यंत नदीपात्रातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेली घरे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली नाही.
नासर्डी नदीपात्रातील अनधिकृत घरे ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:11 AM