उपनगर : सिंधी कॉलनी येथील एका खासगी बंगल्याच्या गच्चीवर अनधिकृतपणे उभारलेल्या मोबाईल टॉवरची साधनसामुग्री पुर्व विभागाच्या अतिक्रमण पथकाने जप्त करून संबंधित बंगला मालकास नोटीस बजावली आहे.उपनगर सिंधी कॉलनी येथे काही महिन्यांपूर्वी एका खाजगी बंगल्याच्या गच्चीवर मोबाईल टॉवर उभारण्यात येत होता. परिसरातील रहिवाशांनी त्या अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारणीस कडाडून विरोध केल्यानंतर टावरचे पुढील काम बंद पडले होते. मनपा प्रशासनाने देखील अनाधिकृत टॉवर उभारू नये म्हणून नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्या बंगल्याच्या गच्चीवर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरला आज दुपारी मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य टॉवर सुरू करण्यासाठी जोडण्यास सुरूवात केली. सदर बाब परिसरातील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरूवात केली. सदर घटनेची माहिती पूर्व प्रभाग सभापती प्रा. कुणाल वाघ यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. वाघ यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम यांना अनाधिकृत असलेल्या मोबाईल टॉवर पुन्हा सुरू करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्य लावणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच मनपा अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी घयनास्थळी दाखल होऊन त्यांनी टॉवरला जोडण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करून संबंधित बंगला मालकास नोटीस दिली. (वार्ताहर)
अनधिकृत मोबाईल टॉवरची साधनसामुग्री जप्त
By admin | Published: December 05, 2014 1:45 AM