इंदिरानगर : प्रभाग ५४ मधील पांडवनगरी परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या अनधिकृत नळजोडणी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी पाणी मीटर वाचकांच्या आशीवार्दानेच असल्याची चर्चा परिसरात आहेत.गेल्या दहा वर्षांत विकसित झालेल्या पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांनी विशेष सवलतीत गृहनिर्माण संस्था उभ्या केलेल्या आहेत. परिसरात सुमारे ४०० सदनिका असून, ६० टक्के सदनिकांमध्ये भाडेकरूंचे वास्तव्य आहे. धुळे, मालेगावसह विविध शहरांतील स्थानिक लोकांनी परिसरात सदनिका घेऊन त्या भाड्याने दिलेल्या आहेत. परिसरातील अपार्टमेंटमधील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जाऊन पोहोचत नसल्याने रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या तीन वर्षांपासून एका अपार्टमेंटला एक इंची नळजोडणीच दिली जाते. सध्या एक वेळ पाणीपुरवठ्यामुळे अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या टाकीत पाणी साठविले जाते. तेथून वरच्या मजल्यावर विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचले जाते. परंतु प्रत्येक घरातील रहिवाशांची संख्या बघता पाणी कमी पडत आहे. त्यामुळे काही रहिवाशांनी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व मीटर वाचकांस सुमारे २० ते ३० हजार रुपये देऊन अनधिकृत नळजोडणी करून घेतली. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर नळजोडणी करून त्यास सर्रासपणे विद्युत मोटारी लावून पाणी खेचले जाते. त्यामुळे परिसरात कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होऊन तीव्र पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून १५ दिवसांपूर्वी पूर्व विभागाच्या वतीने ५० अनधिकृत नळजोडणी तोडण्यात येऊन ५ विद्युत मोटारीही जप्त करण्यात आल्या होता. परंतु अद्यापही ७० ते ८० अनधिकृत नळजोडणी सर्रास सुरू असल्याने पाण्याची चोरी व महसुलातही घट होत आहे. तातडीने अनधिकृत नळजोडणी व विद्युत मोटारी लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्यात येत नसल्याने उलट-सुलट चर्चा होत आहे. (वार्ताहर)
पांडवनगरीत अनधिकृत नळजोडणी
By admin | Published: June 26, 2016 9:43 PM